औदुंबर वृक्ष – कल्पवृक्ष : Audumbar Tree
औदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष:Audumbar Tree

औदुंबर वृक्ष – कल्पवृक्ष : Audumbar Tree

 औदुंबर वृक्ष

हिरण्यकशिपु नावाचा एक दैत्य होता.

देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यु येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे, तो फार उन्मत्त झाला होता.

त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी सहाजिकच होते. त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद.

तो मुलगा मात्र विष्णूभक्त निपजला. त्याचे त्या हिरण्यकशिपुने फार हाल केले.

अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहीले, पण देव तारी त्याला कोण मारी? अखेर दरवेळी मृत्यूमुखांतून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून,

हिरण्यकशिपु प्रल्हादाला म्हणाला,

” काय रे कारट्या, तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे?”

“बाबा, तो चराचरात सर्वत्र आहे.”

“महालाच्या या खांबात आहे का?”

“हो आहे.”

ते ऐकताच हिरण्यकशिपुने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेंव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानवशरीरासारखा अशा रूपांत श्रीविष्णु बाहेर पडले.

तोच त्यांचा नरसिंहअवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपुला त्या महालाच्या उंबरठय़ावर, आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेऊन, त्याचे पोट फाडून ठार मारले.

अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्रीविष्णूंने केला खरा;

परंतु त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते, ते त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखांत भरले.

भगवान नरसिंह

त्यांच्या नखांंचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती.

या वेळी महालक्ष्मीने, मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्रीनृसिंहंना त्या फळांत आपली नखे खूपसावयाला सांगितले.

त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहांंच्या नखांंचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाला.

तेंव्हा लक्ष्मीवर विष्णु प्रसन्न झालेच, परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला.

कल्पवृक्ष वरदान

“हे औदुंबरवृक्षा, तुला सदैव फळे येतील, तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिध्द होईल.

तुझे भक्तिने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझे दर्शन होताच उग्र विष्णुसुद्धा शांत होईल.

ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्यप्राप्ती होईल.”

औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच.

श्री गुरु नृसिंहयती नरसिंहमंत्राची उपासना करताना औदुंबराखाली बसत.

ते स्वतः नरसिंहाचे अवतार. त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदुंबराची शितलता अजूनही त्यांना आवडत होती.

श्रीमहाविष्णु हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रुपात प्रकट झाले.

त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले. 

काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटु लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले.

प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला.

प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला.

प्रल्हादास दवेतसिध्दांताविषयी आसक्ति असल्याचे जाणून घेऊन, श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतीवेष धारण करून दीन जनांचा उध्दार करशील असा आशिर्वाद दिला होता.

परम पवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्रीदत्तांच्या चरण कमलावर पडून मला सुध्दा वर द्या अशी प्रार्थना केली. तेव्हा श्रीदत्तात्रेय म्हणाले,

“प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्या मधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन. असे माझे वचन आहे.”

औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे.

औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते.

औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग

दाह शमन करणारा दैवी वृक्ष: औदुंबर अर्थात उंबर. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो.

उदुम्बराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो.

या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया;

१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे. कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.

२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा.

३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.

४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.

५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो.

६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.

७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात.

८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.

९. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.

१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.

औदुंबराचे फळे आणि पाने
औदुंबराचे फळे आणि पाने

औदुंबर वृक्ष माहात्म्य

दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे.

औदुंबरतळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रूत आहे. अनेक पुण्यवृक्ष त्यजून । काय प्रीती औदुंबरी ?

असा प्रश्न विचारल्यावरून एकोणविसाव्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे.

श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्रीनृसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे.

हिरण्यकशिपूचा श्री र्नसिंहानी वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहीली. त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचे फळ आणले आणि 

तये वेळी शीतलार्थ । नखे रोविली औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला । 

अशा औदुंबरास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. 

Leave a Reply