औदुंबर वृक्ष – कल्पवृक्ष:Audumbar Tree
औदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष:Audumbar Tree

औदुंबर वृक्ष – कल्पवृक्ष:Audumbar Tree

 औदुंबर वृक्ष – कल्पवृक्ष

हिरण्यकशिपु नावाचा एक दैत्य होता. देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यु येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे, तो फार उन्मत्त झाला होता.

त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी सहाजिकच होते. त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद.

तो मुलगा मात्र विष्णूभक्त निपजला. त्याचे त्या हिरण्यकशिपुने फार हाल केले.

अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहीले, पण देव तारी त्याला कोण मारी? अखेर दरवेळी मृत्यूमुखांतून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून,

हिरण्यकशिपु प्रल्हादाला म्हणाला,

” काय रे कारट्या, तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे?”

“बाबा, तो चराचरात सर्वत्र आहे.”

“महालाच्या या खांबात आहे का?”

“हो आहे.”

ते ऐकताच हिरण्यकशिपुने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेंव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानवशरीरासारखा अशा रूपांत श्रीविष्णु बाहेर पडले.

तोच त्यांचा नरसिंहअवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपुला त्या महालाच्या उंबरठय़ावर, आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेऊन, त्याचे पोट फाडून ठार मारले.

अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्रीविष्णूंने केला खरा; परंतु त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते, ते त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखांत भरले.

त्यांच्या नखांंचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती. या वेळी महालक्ष्मीने, मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्रीनृसिंहंना त्या फळांत आपली नखे खूपसावयाला सांगितले.

त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहांंच्या नखांंचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाला.

तेंव्हा लक्ष्मीवर विष्णु प्रसन्न झालेच, परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला,कल्पवृक्ष वरदान”हे औदुंबरवृक्षा, तुला सदैव फळे येतील, तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिध्द होईल. तुझे भक्तिने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझे दर्शन होताच उग्र विष्णुसुद्धा शांत होईल.

ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्यप्राप्ती होईल.” औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच.

श्री गुरु नृसिंहयती नरसिंहमंत्राची उपासना करताना औदुंबराखाली बसत.

ते स्वतः नरसिंहाचे अवतार. त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदुंबराची शितलता अजूनही त्यांना आवडत होती.

Follow us Facebook