श्री गिरनार व अखंड धुनी : Shri Girnar
श्री गिरनार - Shri Girnar

श्री गिरनार व अखंड धुनी : Shri Girnar

श्री गिरनार

दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार..

भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. 

१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.

भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. 

शिवपुराणात गिरनार चा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे.

स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात.

रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती ( ब्रह्मा, विष्णू, शंकर ) यांच्याशी निगडीत आहेत.

श्री रामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात.

पुराणां मध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो.

वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत.

असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे.

पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि.मी. अंतरावर आहे.

या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजन म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ.कि.मी.ने व्याप्त आहे. 

गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे. 

कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे.

अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधनारत आहेत.

बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.

ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न झालेली आहे.

म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. 

गिरनार मंदिर प्रवेशद्वार 

गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. 

महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते.

तेथे मृगी कुंड आहे.

शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात.

मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते.

अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.

मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही.

अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो.

आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत .

त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूचा एक आश्रम बघण्यासारखा आहे.

अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.

आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे.

गुरु शिष्य नाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते.

आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल याकडे स्वतः शेरनाथ बांपूचे कटाक्षाने लक्ष असते. 

लम्बे हनुमान मंदिर

लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि मी आत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मिरीबापूंचा आश्रम आहे.

श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे १५० वर्षाच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे,

याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने प्रवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे.

वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायर्‍या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरवात करतात. 

ज्या भाविकांना शारीरिक दृष्ट्या चढणे अशक्य वाटते त्यांच्यासाठी कमानी जवळ डोलीवाले असतात.

डोलीवाले एका व्यक्तीसाठी १०,००० ते १५,००० रूपये घेतात. 

सुमारे २०० पायर्‍यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते.

पुर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते.

सर्व साधू संतांमध्ये त्याचा मान खूप मोठा होता.

२,००० पायर्‍यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो, हे ही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात. 

२,२५० पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथा मध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे.

आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात, 

थोडे बाजूला माली परब घाट येतो, तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे.

२,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. 

थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवी चे स्थान आहे.

संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे

येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत.

बाजूला जैन मंदिर येते. मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे.

प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे.

काळ्या पाषाणामधील नेमिनाथांची अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे.

नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे.

या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे.

थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कला-कुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत.

थोडे पुढे गेल्यावर गौ-मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते, येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते.

बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे.

गौ-मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे डाव्या बाजूला एक उतण्याचा मार्ग आहे. 

ग्रामस्थ, भाविक, साधू बैरागी या मार्गांने येत अथवा जात नाहीत, या मार्गांवर कूठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलावाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहित नाही. 

गौ-मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर ४,८०० पायऱ्यावर अंबाजी टुंक येते.

५१ शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे.

देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे.

या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो, होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे.

मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय रहात नाही.

मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकाला येतोच येतो.

येथून पुढे ५,५०० पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते.

गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान आहे.

समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुटावर हे स्थान येते.

साधारणपणे गुरूचे स्थान उंचीवर असते.

गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की” आपले चरण दर्शन मला सतत व्हावे;

दत्तमहाराजांनी हे मान्य केले.

यामुळे गोरक्षशिखर उंचावर आहे.

नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. त्यांना प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे.

आणि आजही गुप्त रूपाने गोरक्षनाथांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे.

बाजूलाच गुरु गोरक्ष नाथांची अखंडधुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्ष नाथांनी चौऱ्यांशी सिध्दांना उपदेश केला व बाजूलाच नवनाथानां गुरु दत्तात्रेयानी यांचा ठिकाणी गुरुमंत्र दिला होता.

बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी ( बारी ) आहे म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे.

या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था मंहत श्रीसोमनाथ हे पहातात.त्यांचा दत्त संप्रदायातील “सेवा” या शब्दावर नितांत विश्वास आहे.

गोरक्ष टुंक नंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी १,००० ते १,५०० पायऱ्या उतरायला लागतात. 

श्री गिरनारी बापूंची गुंफा लागते.

येथे श्री भैरवनाथाचे मंदिर आहेत.

जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्री गिरनारी बापू “प्रसाद” म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात .

थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे.

डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर १,००० पायऱ्या चढल्यावर दत्तटुंक किंवा गुरूशिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे.

श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो.

यांचा स्थानवर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तां मध्ये आहे.

१० X १२ चौ फूट जागे मध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे.

बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते.

चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. 

येथे एक प्राचीन घंटा आहे. तो घंटा ३ वेळा आपल्या पूर्वजांची नांवे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे . 

ईथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली किंवा कमंडलू स्थानापाशी जाता येते. 

भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते.

तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही सांधकांचा दत्त उपासनेचाच भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते.

ते येथे येऊनच अनुभवावे पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढग सुध्दा शिखरा पासून खाली असतात. 

उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानकडे जायला ३०० पायऱ्या उतरायला लागतात .

इथे ५,००० वर्षे पासून असलेली अखंड धुनी आहे.

ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे.

आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे ६.००-६.३० वाजता तासाभरासाठी प्रकट होते…स्वयंभूपणे…

कोणत्याही प्रकारे अग्नी न पुरवता…

त्या अग्नीरुपानं साक्षात् श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात.

कमंडलकुंड स्थानी असलेले साधू सुमारे ५-६ मण काष्ठं पिंपळाची लाकडे समर्पित करतात (आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्नीकुंडात रचून ठेवतात.)

आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पातं लवण्याच्या आतंच् श्रीदत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्नीनारायणाची २ पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. श्रध्दावान भक्तांस त्या मध्ये साक्षात् दत्तप्रभूंचे दर्शन होते.

या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे (म्हणजेच रविवारी मध्यरात्री) २.००-२.३०च्या दरम्यानच पर्वतारोहणास आरंभ करावा लागतो.

येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते.

अशी अख्यायिका आहे कि, भगवान दत्तात्रेय ध्यानात हजारो वर्षे दत्तटुंकवर बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती .

प्रजेची दया येऊन देवी अनुसूया मातेने ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले.

एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले.

एक ठिकाणी अग्नी ( जिथे धुनी आहे ) प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरुन जलकुंड निर्माण झाले तेच हे कमंडलू स्थान आहे.

येथील आश्रमामध्ये अन्नछत्रही आहे. आजही हे अन्नछत्र २४ तास सेवेत असते.

दत्तमहाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात .

या अन्नछत्राचा लाभ थकल्या भागलेल्या दत्त भाविकांना मिळतो. 

आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुंफेच्या डोंगराकडे जाता येते.

ही वाट तशी घनदाट जंगलातील असून येथे पायऱ्या नसून खडकाळ दगडावरुन जावे लागते.

बाजूलाच दिसणाऱ्या दऱ्या अन् ओबडधोबड रस्ता हा सर्व सामान्यांसाठी कस पाहणारा ठरतो.

गुंफेमध्ये मातेचा उग्र मुखवटा असलेली मूर्ती आहे.

आत बेताच्या उंचीमुळे पूजा-अर्चा बसूनच करावी लागते.

बाजूलाच असणाऱ्या दोन डोंगरावर रेणुकामाता अन् अनुसूयामाता विराजमान आहेत.

गिरनारच्या बाजूला नजर टाकली की भव्य *दातार पर्वत* दिसतो. या पर्वतावर चढताना साधारण ३,००० पायऱ्यावर दातार भगवान वसले आहेत.

त्यापुढे नवनाथांचे स्थान आहे. या पर्वतावर चढण्याचा रस्ता फारच अवघड आहे.

दातार पर्वताच्या समोरच असलेला जोगीणीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे.

या डोंगरावर जाण्यास आजही कोणी धजावत नाही.

या डोंगरावरील एका गुंफेमध्ये शिवलिंग असून, ही अरूंद गुंफा आत प्रशस्त होत गेली आहे.एक वृद्ध बापू तेथे सेवा करतात.

याच डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे.

माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे.

गिरनारच्या ९,९९९ पायर्‍या आहेत प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीत चढायचे असते. शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा आहे.

काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत. त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत.

जोपासल्या गेल्या आहेत.त्या समूळ नाहीशा होतील तेव्हाच दत्त भेटतील.

जोपर्यंत तुझ्यातील ” मी ” मरत नाही, तो पर्यंत मनाचा गाभारा सर्वार्थाने पवित्र होत नाही.

*!! अवधुत चिंतन !!*

*!! श्री गुरुदेव दत्त !!*

Top 5 Largest Stationery Company

Leave a Reply