शंकराची आरती : Shankarachi Aarti
शंकराची आरती:Shankarachi Aarti

शंकराची आरती : Shankarachi Aarti

शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।२।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपषं प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ।।३।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी ।।४।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

The Clownfish Rain Coat for Men Waterproof for Bike with Hood Raincoat for Men. Set of Top and Bottom Packed in a Storage Bag Indus Pro Series

शंकराची आरतीचा इतिहास

पुणे जिल्ह्यात जेजुरी गडाजवळ लवथळेश्वराचे मंदीर आहे…

लवथळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे जागृत स्थान असे मानले जाते.

या स्थानाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये महत्म्य सांगितले आहे’

दुर्वास ऋषींचा लवा नामक शिष्य होता त्याला स्वतःला आपल्या तप साधनेमध्ये व्यत्यय येवू नये असे वाटत होत.

ही बाब त्यांनी आपल्या गुरूच्या कानी घातल्यानंतर, दुर्वास ऋषींनी शिष्याच्या तपश्चर्येसाठी हा परिसर दानव – शाकिनी – डाकिनी – भूत – पिशाच्च यांच्या संचारापासून अभिमंत्रित करून मुक्त केला, तोच हा लवथळेश्वर परिसर.

पुढे कृतयुगामध्ये मणीचूल पर्वतावरील सप्तऋषींना मणीमल्ल दैत्यांपासून आपली कुटुंबे सुरक्षित ठेवण्यासाठी नारद मुनींनी याच परिसरामध्ये धेवण्याचे सुचविले. 

समर्थ जेंव्हा लवथळेश्वराच्या दर्शनास आले तेंव्हा त्यांना जी आरती सुचली तीच आपण रोज म्हणतो!

बरेचदा केवळ पाठ झाल्याने आपण आरत्या गातो, तिचा अर्थ ठाऊक असेल तर मात्र ती अधीक आर्ततेने करता येईल!

शंकराची आरतीचा अर्थ

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥

समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे (गंगा)

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

हे शंकरा तुझा जयजयकार असो!

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कापरासाख्या गो-या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।|

हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस…

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥

तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे, तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत.

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे…

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें । त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें ॥

देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले…

तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली…

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या…

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

पाच मुखे असणा-या, मनमोहका, मुनीजनांना आनंद देणा-या…शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

(शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो “श्रीराम जय राम जय जय राम ” हा मंत्र सतत वाचेने उच्चारणा-या…)

रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो!

– श्री समर्थ रामदास

https://heydeva.com/ganpati-aarti/

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. mohan tiwari

    om namah shivay….