तुळजाभवानी मंदिर , तुळजापूर : Tuljabhavani Temple, Tuljapur
तुळजाभवानी मंदिर , तुळजापूर : Tulja Bhavani Temple, Tuljapur

तुळजाभवानी मंदिर , तुळजापूर : Tuljabhavani Temple, Tuljapur

Tuljabhavani Temple-तुळजाभवानी मंदिर , तुळजापूर

तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे.

येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे.

महाराष्ट्राचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्यदैवत, कुलस्वामिनी व साडेतीन पिठापैकी एक पूर्ण पीठ “श्री तुळजाभवानीचे मंदिर” श्री क्षेत्र तुळजापूर, जिल्हा- उस्मानाबाद, येथे आहे.

महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे.

या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते.

कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.

संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे.

कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात – धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे.

अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.

उस्मानाबाद – तुळजापूर अंतर 22 कि.मी. आहे. व सोलापूर येथून ४५ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.

रेल्वे ने सोलापूर किवा उस्मानाबाद ला येवु शकता तेथून बस चालू आहेत.

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले.

त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती.

सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.

परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही.

कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला;

परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली.

आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली.

तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.

त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली.

दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला.

यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले.

दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला.

तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.

ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले.

कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.

निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करीत नसत.

1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती. या साली गावची लोकसंख्या सूमारे ५००० इतकी होती.

भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.

त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते.

देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली.

तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला.

यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.

या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते.

त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.

पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.

नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.

हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे.

मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.

इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.

होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे.

हे पाच मजली इमारत असून धर्म दर्शन व मुख दर्शन अशे भाग केले आहेत.

गाभा-याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत.

देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे.

तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे.

तिच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते.

देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो.

देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही.

देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे.

आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍

गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.

तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे.

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)

तुळजाभवानी दसरा महोत्सव मध्ये देवीच्या आकर्षक अलंकार पूजा मांडण्यात येतात.

भारतात एक मात्र मुर्ती जी स्थलांतरित आहे. देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा घेते. दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक वेळा अहमदनगर पलंग येतो.

आई तुळजा भवानीच्या सर्व प्रथा आणि परंपरा इतर देवस्थानापेक्षा अतिशय भिन्न आहेत.

आई तुळजाभवानीची मूर्ती प्रत्यक्ष पालखीत बसून मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात .

एक वर्षात तीन वेळेस देवीला तिच्या मूळ सिंहासनावरून उठवून पलंगावरती निद्रिस्त करण्यात येते !.

अशी एक आख्यायिका आहे की, आई तुळजाभवानी ही तेली कन्या असल्याने तुळजापुरात कुठलाही तेलघाना चालत नाही.

मात्र पालखी आणि पलंग हे पुरविण्याचा मान अहमदनगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील तेली कुटुंबाला आहे !.

आपण तुळजाभवानी मंदिरात गाभार्‍यात गेल्यानंतर, उजव्या हाताला ओवरीत देवीचा पलंग दिसतो. भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या, अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, या कालावधीत आई तुळजाभवानीची मूळ मूर्ती या पलंगावर निद्रीस्त केली जाते !.

यालाच देवीची “घोर निद्रा”, “श्रम निद्रा”, आणि “भोग निद्रा” असे म्हटले जाते. विजया दशमी (दसऱ्या ) नंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी सन्मानपूर्वक मोडतोड करून , जुना पलंग होमात टाकला जातो आणि नवीन पलंगाची स्थापना करण्यात येते.

तुळजापुरातील एक घराणे पिढ्यानपिढ्या ही सेवा देत असल्याने त्यांना “पलंगे” आडनावाने ओळखतात !.

पालखी आणि पलंग पुरविण्याचा मान हा नगर आणि पुणे जिल्ह्यातील तेली कुटुंबाचा असला तरी, या वस्तू तुळजापूर पर्यंत पोहोचवण्याचा एक अनोखा प्रवास आहे !.

पलंग बनविण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर कुटुंबाचे आहे. श्रद्धापूर्वक पलंग बनविल्या नंतर ठाकुर कुटुंबाचे काम संपते. असे असले तरी एकदा हाच पलंग तुळजापुरात पोहोचला की, हेच कुटुंब त्या पलंगाला हात पण लावू शकत नाही !.

पलंग बनवल्यानंतर, तो घोडेगाव येथील तेली समाजातील भगत कुटुंबाकडून, इतर भक्तासह , वाजत गाजत जुन्नर- नारायणगाव- आळेफाटा – पारनेर मार्गे अश्विन शुद्ध प्रतिपदेला, घटस्थापनेच्या दिवशी अहमदनगर येथील तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल होतो !. तिसऱ्या दिवशी हाच पलंग नगर जवळील भिंगार येथील मंदिराकडे प्रस्थान करतो !

पालखीच्या खालचा भाग बोरीच्या लाकडाचा असून बाकी सर्व लाकूड सागवान असते ! पालखीचा मुख्य आडवा दांडा हा जुन्या सागवानी लाकडाचा असतो.

अशाप्रकारे लाकडांची पूर्तता झाल्यानंतर पालखी बनवण्याचा मान राहुरी येथील कै उमाकांत सुतार यांच्या घराण्याला आहे. पालखीचे लाकूड कतईचा मान धनगर समाजातील भांड या कुटुंबाकडे आहे .

पालखीच्या खिळापट्टीचे काम लोहाराचे रणसिंग नामक कुटुंब करते !

अशा रीतीने वेगवेगळे मानपान देऊन पालखी तयार होते !

सुताराच्या घरी विधीवत पूजा करून , तेली समाजातील धोत्रे हे कुटुंब पालखीला राहुरी येथील तुळजाभवानीच्या मंदिरात आणतात !

यावेळी कुंभार समाजाचे मानकरी तेलाचे दिवे पुरवितात तर तेली समाजातील मानकरी तेल पुरवतात !

सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती ,शंकराची स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो.

मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह, खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात.

येथील काही प्रेक्षणीय स्थळे:-

काळभैरव:– हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.

आदिमाया व आदिशक्ति:– देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ह्या देवता आहेत.

घाटशीळ:– डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आत देवीच्या पादुका आहेत.घाट्शीळवर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला .तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला ‘तू का आई?’

येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदिर संस्थानने बांधलेली बाग आहे.

पापनाश तीर्थ:– हे एक तीर्थ असून पापनाशिनी असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.देऊळ जुने पण मजबूत आहे.

रामवरदायिनी -येथे रामवरदायिनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सीतेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असताना या देवीने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवला.

देवीच्या मुर्ती वर सुंदर नक्षी असुन डाव्या हाताच्या करंगळी ने रमला मार्ग धावले हे मुर्ती वर दिसुन येते. याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.

भारतीबूवाचा मठ:– देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मूळ पुरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सारीपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे.

गरीबनाथाचा मठ:–हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.

नारायणगिरीचा मठ:– हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथील क्रांती चौकात आहे.

मंकावती तीर्थ:–मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेही म्हणतात.यावर महादेवाची पिंड आहे.तसेच मोठे मारुती मंदिर आहे.

धाकटे तुळजापूर:–येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते.

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे.

देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही.

मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे.एक आकर्षण करून घेणार देवस्थान आहे.

Leave a Reply