नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून ५१ कि.मी. वर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर वसले आहे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी.

दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी १२ वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते.
श्रीनृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडल्याचे सांगितले जाते.
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.
वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे.
१३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले.
त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता.

नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले.
कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत.
वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरू असते.
यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना ‘मनोहर पादुका’ असे नाव आहे. या पादुकांची मध्यान्ही पूजा केली जाते.
या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंला उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे.
त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे.
मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी जेथे आसनस्थ होऊन पूजा करतात, त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिचीही पूजा होते.
सांप्रत उभे असलेले नरसोबा वाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजार्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते.
यापैकी औरवाड म्हणजेच पूर्वीचे अमरापूर. या गावाचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये येतो.या गावात अमरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
नसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही.
हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच संथ वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे.
नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात. इथे नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे.