श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य
श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदुराजा, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात.
या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘संस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे. या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली.
१) यदुराजा
ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. त्याला दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा अशा दोन पत्नी होत्या.
ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता. त्यांनी संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते.
आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेत त्याने अनेक वर्षे राज्य केले. कालांतराने तो वृद्ध झाला.
मात्र तरीही त्याची भोगलालसा काहीं कमी होईना, त्याला शुक्राचार्यांनी आशिर्वाद दिला की ,”जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारुण्य दिले आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येतील.”
त्याला देवयानीपासून यद् व तुर्वस्तु असे दोन आणि शमिष्ठेपासून अनू, द्रह्यु आणि पुरु असे तीन एकुण पाच पुत्र झाले होते.
पुढे यांना यादव, तुर्वसू, द्रुह्यू, अनवा आणि पौरव कुळ म्हणून ओळखले जाऊ लागले. ऋग्वेदात यांना पंचकृष्टय म्हणतात.
त्याने पाचहीं पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली.
त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र यदू याने वार्धक्य स्वीकारायला नकार देताना,” जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवयानीबरोबर भोग भोगलेत तर तुमच्या रूपाने मीच माझ्या आईबरोबर भोग भोगल्याचे पाप मला लागेल.”असे सांगितले.
तेव्हा संतापून ययातीने त्याला हाकलून दिले आणि त्याला राज्याचा भागही दिला नाही.
तेव्हा पुरूने त्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्याला दिले.
भविष्यात राजा बनल्यावर पुरू राजाने आपल्या ज्येष्ठ भावाला, यदूला राज्याचा वाटा दिला.
हा यदू राजा अत्यंत नीतिमान आणि श्रीदत्तात्रेयांची असीम भक्त होता.
वडिलांनी हाकलून दिल्यानंतर तो श्रीदत्तात्रेयांच्या शोधात भटकत होता.
एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये दर्शन दिले.
तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला, त्याच्या डोळ्यांमधून अश्रुपात सुरू झाला.
त्याने श्रीदत्तात्रेयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीदत्तात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली.
यदुराजाने श्रीदत्तात्रेय यांची शेवटपर्यंत उत्कट भक्ती केली.
त्याने धर्माच्या अधीन राहून प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ करून अत्यंत ऐश्वर्यशाली असे राज्य केले.
त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला.
याच वंशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.
यदू हा श्रीदत्तात्रेय यांचा लाडका शिष्य होता आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान केले.
पुढच्या पोस्ट मध्ये परशुराम कसे श्री दत्तात्रेयांचे शिष्य बनले ते लिहणार आहोत.
||श्री गुरुदेव दत्त||