करुणात्रिपदी : Karunatripadi
श्री दत्त करुणात्रिपदी- Shree Datta Karunatripadi

करुणात्रिपदी : Karunatripadi

करुणात्रिपदी

करुणात्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ रचना आहे.

देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या.

या करुणात्रिपदीतून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभूंना विनवणी करीत आहेत.

आजच्या घडीला श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे.

साक्षात् दत्तावतार प. प. श्री. टेंब्ये स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की होतेच.

अपराधक्षमापनासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील, एकमेवाद्वितीय, अद्भुत व अलौकिक काव्य म्हणून करुणात्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे !

Tata Sampann High in Fibre White Thick Poha, 500g

आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंतांची ते प्रार्थना करीत आहेत. 

करुणात्रिपदी

(श्रीमद्वासुदेवानन्‍दसरस्वतीस्वामीविरचित)

शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।धृ।।

तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता ||

तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ||

भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ||

तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ||

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।१।।

अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।।

तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ।।

तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ||

सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ||

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।२।।

तू नटसा होउनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी ||

पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ।।

गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी ||

निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ।।

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।३।।

तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ||

सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा (दुसरा) त्राता ||

निजबिरुदा आणुनि चित्ता । तू पतितपावन दत्ता ||

वळे आतां आम्हांवरता | करुणाघन तू गुरुनाथा ||

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।४।।

सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार ||

तव पदी अर्पू असार । संसाराहित हा भार ||

परिहरिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबन्‍धो ||

आम्हां अघ लेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ।।

शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।५।।

श्री दत्त गुरु

श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।धृ।।

चोरे द्विजासी मारीता मन जे । कळवळले ते कळवळो आता ।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।१।।

पोटशूळाने द्विज तडफडता । कळवळले ते कळवळो आता ।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।२।।

द्विजसुत मरता वळले ते मन । हो की उदासीन न वळे आता।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।३।।

सतिपति मरता काकुळती येता । वळले ते मन न वळे की आता।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।४।।

श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आता।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।५।।

 

जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।धृ।।

निज-अपराधे उफराटी दृष्टी । होऊनि पोटी भय धरू पावन ।।

जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।१।।

तू करुणाकर कधी आम्हांवर । रुसशी न किंकर-वरद-कृपाघन।।

जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।२।।

वारी अपराध तू मायबाप । तव मनी कोप लेश न वामन ।।

जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन।।३।।

बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।

जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ।।४।।

प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव । पदी देवो ठाव देव अत्रिनन्‍दन।।

जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन।।५।।

|| दत्तगुरू ||

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

वाचकहो… आपण कुठेही असा प्रवासात घरी दारी न चुकता आपल्या पठनात ठेवा.

आर्तभावनेने त्रिपदी पठन करा मग बघा दत्त महाराज तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील तर मित्रहो दत्त प्रभूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांन पर्यंत करूणा त्रिपदीचा प्रचार प्रसार करा.

Leave a Reply