Rakshabandhan – रक्षाबंधन
रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी असतो या दिवसाला राखी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा सण देखील याच दिवशी असतो.
रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या अतूट नात्याचा सोहळा साजरा करण्याचा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि आपले संरक्षण करण्याचे वचन घेते आणि आणि भावाच्या मंगल आयुष्याची कामना करते.
या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे या पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात.
कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे.
पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे.
दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले.
इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला.
त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला.
त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले.
त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती.
तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.
भगवान विष्णू ने जेव्हा वामन अवतार घेतला होता व राजा बळी ला पाताळात पाठवले होते तेव्हा भक्त म्हणून राजा बळीने त्यांना नेहमी आपल्या नजरेसमोर राहण्याचा आशीर्वाद मागितला होता अशा वेळेस भगवान विष्णू यांना राजा बळी सोबत पाताळात राहावे लागले.
परंतु यामुळे देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांची ताटातूट झाली. नारद मुनींनी देवी लक्ष्मी यांना राजा बळी यास भाऊ मानण्याचा सल्ला दिला.
देवी लक्ष्मी जेव्हा उदास होऊन पाताळात गेल्या तेव्हा राजा बळीने त्यांना त्यांच्या उदासीन तेचे कारण विचारले तेव्हा देवी लक्ष्मी यांनी सांगितले की त्यांना कोणी भाऊ नाही तेव्हा राजा बळीने देवी लक्ष्मी यांना आपली बहीण मानले.
जेव्हा भेट वस्तू म्हणून त्यांनी देवी लक्ष्मी यांना विचारले तेव्हा देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूची मागणी केली.
राजा बळीने देखील त्यांना भगवान विष्णू सुपूर्त केले व तेव्हापासून बहिण भावाच्या नात्याची सुरुवात झाली असे म्हणले जाते.
यासोबत एक आख्यायिका आहे.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।
बहीण राखी बांधताना ही कामना करते की जशी राजा बळीला रक्षासुत्र म्हणुन गुरु शुक्राचार्य यांनी राखी बांधली तशी मी तुला राखी बांधते.
महाभारतात श्री कृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते.
आपल्याला माहितीच आहे की भगवान कृष्ण यांनी पांडवांची बायको द्रौपदी हिस आपली बहीण मानले होते.
तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधून दिले होते.
तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे आजन्म रक्षण करण्याचा ठरवले.
जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा द्रौपदीने आपल्या भावाला मदतीचे आवाहन केले.
यावेळेस भगवान कृष्ण यांनी वस्त्र पुरवून द्रौपदीचे संरक्षण केले ज्याने बहीण भावाचे नाते अधिकच दृढ बनले.
तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले..
भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला.
आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.
या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नेसल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो.
राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे.
या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.
पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.
आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.