रामेश्वर मंदिर, मिठबाव, देवगड – Shri Rameshwar Mandir Mithbav, Devgad
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील ‘गिर्ये’ हे कोकणातील इतर अनेक निसर्गसंपन्न गावांसारखंच एक गाव!
याच गावची ग्रामदेवता म्हणजे ‘रामेश्वर मंदिर’.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना असलेल्या मंदिरांचा जणू खजिनाच.
इथली मंदिरं आजही पुरातन अवशेषांच्या पाऊल खुणा जपत श्रद्धा आणि भक्तीची साक्ष देतात.
इतकंच नाही तर लोकजीवनाचा सेतू म्हणून जनमानसात आपलं अढळ स्थान राखून आहेत.
‘मंदिर’ या संकल्पनेनं कोकणात जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रुजवला असून माणसांना उत्सवाच्या माध्यमातून जोडल्याने धार्मिक व सांस्कृतिक संचित निर्माण केलं आहे.
सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अठराव्या शतकाच्या सुरूवातीस बारीक कोंदलेल्या दगडांचा गाभारा बांधला.
मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी एक शिवलिंग आहे.
अठराव्या शतकाच्या मध्यास सरदार संभाजी आंग्रे आणि शंखोजी आंग्रे यांनी मंदिराच्या समोर चार सुंदर कोरलेल्या लाकडी खांबांसह मंडप उभारला.
हा पूर्ण परिसर सभोवताली भिंती बांधून वेढलेला होता व आत गर्भगृह, मंडप आणि एक छोटेसे मंदिर तयार केले गेले होते.
मंदिराची इमारत 4,025 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेली आहे.
मुख्य मंदिराच्या इमारतीच्या बाहेरील भागात दगडांच्या फरशा ठेवल्या आहेत.
1780 मध्ये, विजयदुर्ग प्रदेशाचे सुभेदार गंगाधर भानू यांनी २० कोरीव खांब असलेला एक विशाल सभामंडप बांधला.
सरदार आनंदराव धुळप यांनी मंदिराच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील बाजूला दोन अतिरिक्त दरवाजे लावले.
पूर्वेकडील दरवाजा मंदिराला लागून असलेली एक लहान टेकडी कापून बांधला गेला.
सरदार धुळप यांनी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारही बांधले. पूर्वेकडील दरवाजावर एक विशाल घंटा आहे ज्यावर 1791 हे वर्षं कोरलेले आहे.
ही घंटा पोर्तुगीज जहाजातून आणली गेली होती, जी मराठा नौदलाने हस्तगत केली. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या जहाजाचे मुख्य लाकडी मस्तूल बसविण्यात आले आहे.
गाभा-याचे कळसापर्यंतचे बांधकाम सुंदर कलाकुसरयुक्त असून कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
संपूर्ण मंदिर सभामंडपासह ५४ खांब्यांवर उभं असून समोर चार दीपमाळा आहेत.
मंदिराची बांधणी तंजावर धाटणीची असल्याने सिंधुदुर्गातलं हे बहुदा पहिलंच मंदिर असावं.
गाभा-यातली शिवपिंडी मात्र काळ्या पाषाणातील असून ती जुनीच आहे.
आता सात मूर्त्यां नव्याने आणल्या असून त्यात श्री गणेश, विठ्ठल, रखुमाई, विरभद्र, नंदी व सटी-मटी यांचा समावेश आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, इथले लोके व राणे हे इनामी संस्थान असलेल्या आचरा येथील रामेश्वर मंदिरातील रामनवमी उत्सवाला मानकरी म्हणून हजर असायचे.
त्यांच्या उपस्थितीशिवाय तेथील वार्षिकोत्सव साजरा होत नसे. परंतु एका वर्षी तुफानी पावसापुढे आचरा नदीला पूर आल्याने त्यांना मंदिरात जाण्यास विलंब झाला.
परिणामी त्यांच्या जाण्यापूर्वीच उत्सव साजरा झाल्याने राणे व लोके संतापले.
आपल्या अपमानाने क्रोधीत झालेल्या राणे व लोके यांनी त्याच नदीपात्रातून छत्तीसगुणी काळ्या पाषाणातून एक पिंडी तयार करून त्याची विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली, तेच हे श्री रामेश्वर मंदिर!
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून रु. ५१/- ची सनद घाडीगावकरांकरवी या मंदिराला प्राप्त झाली आहे.
पेशवेकाळात चिमाजी आप्पांनी आपल्या पत्नीचा नवस फेडताना मंदिराला एक पालखी भेट म्हणून दिल्याचं सांगितलं जातं.
मंदिराच्या आवारात ११ सती समाधीस्थळं असून इथल्या फाटकवाडीतून दत्ताची पालखी रामेश्वराच्या भेटीला येते.
श्रीदेव कुणकेश्वर दर्शनासाठी येणा-या देवांचे तरंग व पालख्या या मंदिरात पाहुणचार व रामेश्वर भेट घेऊनच पुढे मार्गस्थ होतात.