श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१ : Shri Gajanan Vijay Granth

अध्याय १८

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा । हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥ हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना । हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥ काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी । तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥ भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी । ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्ण्न बहुसाळ ॥४॥ म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा । सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥ अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं । तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥६॥ हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य । शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥७॥ बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी । ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥ बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत । घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥९॥ परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला । तेणें जनकजननीला । शिक झाला अनावर ॥१०॥ बायजेकडे पाहून । जननी करी रोदन । माझ्या बाईचें तारूण्य । वांझ पाहूं राहातें ॥११॥ भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी । दुसरा नवरा करून इसी । देणें आहे भाग पाहा ॥१२॥ शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर । हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥१३॥ कांहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं । बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥१४॥ नपुसकत्व अधोपरी । आलें असेल त्याला जरी । तें औषधानें होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥१५॥ ऐसें उभयतां बोलून । बायजासी तेथें ठेवून । आले मुंडगांवाकारण । आपुल्या घरातें ॥१६॥ बायजीचें वय पंधरासोळा । वर्ण काळासावळा । तारुण्यानें मुसमुसला । होता जिचा शरीरभाग ॥१७॥ डोळे नाक पाणीदार । बांधा उंच मनोहर । जिला पाहातां अंतर । कामुकाचें मोहित होई ॥१८॥ तिच्या थोरल्या दिरासी । पाहूनियां बायजासी । इच्छा जाहली मानसीं । संभोग तिचा करावया ॥१९॥ त्यानें प्रयत्न केले नाना । वळवावया तिच्या मना । म्हणूं लागला क्षणक्षणा । ऐसें बायजाकारणें ॥२०॥ हताश ऐशी मुळीं न होई । मीच तुला पतीचे ठायीं । आमरण करीन पाही । तुझें वेडे संगोपन ॥२१॥ झुरणें दे हें सोडून । आनंदित ठेवी मन । वेडे आजपासून । मीच नवरा समज तुला ॥२२॥ ऐसें त्यानें सांगावें । चाळे नाना करावें । कांहीं आमिष दावावें । चित्त तिचें भुलवाया ॥२३॥ परी उपयोग होईना । बायजीच्या न हें येई मना । ती म्हणे हे नारायणा ! । कां रे दैन्य मांडलेंस ? ॥२४॥ बाळपणापासून । ध्याइले मीं तुझे चरण । त्याचेंच कां हें मजलागून । फल दृष्टीं पडावें ? ॥२५॥ जयाचा मीं हात धरिला । तो ना पुरुष कळून आला । दैवयोग समजून चुकला । संसार नशिबीं नाहीं मम ॥२६॥ बरें झालें तुझ्याठायीं । चित्त आतां रमेल पाही । कृपा करीरे शेषशायी । स्पर्श पुरुषाचा न होवो मला ॥२७॥ ज्येष्ठ दीर एके दिवसीं । येता झाला बायजापासीं । आपला हेतु कळविण्यासी । रात्रीचिया समयाला ॥२८॥ तों बायजानें इनकार । करून केलें उत्तर । कैसी लाज तिळभर । नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥२९॥ तूं माझा ज्येष्ठ दीर । पित्यापरीस साचार । सोडा हा अविचार । स्वैर ऐसा होऊं नको ॥३०॥ ह्या तियेच्या भाषणा । तो ना आणी मुळीं मना । होतां कामाची वासना । नीति विलया जातसे ॥३१॥ अंगावरी टाकण्या हात । जों तो पाही इतक्यांत । तयाचा तो थोरला सुत । माडीवरून पडला हो ॥३२॥ खोक पडली डोक्यासी । बायजेनें धरिलें त्यासी । बसवून आपुल्या मांडीसी । औषध लावूं लागली हो ॥३३॥ बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा । या गोष्टीचा विचार करा । अभिलाष तो नाहीं बरा । परस्त्रियेचा केव्हांही ॥३४॥ मुलगा पडलेला पाहून । भय पावलें त्याचें मन । अनुताप त्यासी झाला पूर्ण । केलेलिया कर्माचा ॥३५॥ त्यानें नाद सोडिला । सदनीं निवांत राहिला । पुढें शिवराम घेऊन गेला । कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥३६॥ भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी । महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥३७॥ तें मानेलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी । महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥३८॥ बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर । कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥३९॥ तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले । अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥४०॥ जेवढे पुरुष जगतांत । तेवढे असती हिचे तात । उगे न पडा फंदांत । लग्न हिचें करण्याच्या ॥४१॥ तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला । घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवीं ॥४२॥ परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं । निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥४३॥ समर्थांचा एक भक्त । पुंडलिक नामें मुंडगांवांत । त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥४४॥ पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला । शेगांवांस जाण्याला । पुंडलिकाचे बरोबर ॥४५॥ त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिले । तेच तिच्या करतील भले । निजकृपेनें कल्याणा ॥४६॥ पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी । ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥४७॥ पुंडलिकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी । तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥४८॥ हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें । तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥४९॥ बायजा आहे तरणीज्वान । पुंडलिकासीही तारुण्य । यांची वारी विषयभान । हीच आहे निःसंशय ॥५०॥ परस्परें प्रीति जडली । विषयसुखाची नवाळी । गण्या ही युक्ति केली । वाटते या उभयतांनीं ॥५१॥ पुंडलिक जरी माळी असता । तरी हा संबंध योग्य होता । बायजाच्या धरण्या हाता । कां कीं तरुण दोघेही ॥५२॥ पुंडलिक आहे मराठी । ही माळ्याच्या आली पोटीं । म्हणून यांची ताटातुटी । केलीच पाहिजे जातीस्तव ॥५३॥ या दोघांचें अंतर । शुध्द होतें साचार । नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥५४॥ भुलाई म्हणे बायजासी । तूं कां कारटे अहर्निशीं । पुंडालिकाच्या घरा जासी । हें कांहीं कळेना ॥५५॥ ऐशा तरुण वयांत । तुम्हां कशाचा परमार्थ ? । कोल्हा न राही उपोषित । उंसाचिया फडामधीं ॥५६॥ वा पाहून बाटुकाला । बैल नाहीं पुढें गेला । कारटे आमुच्या नांवाला । काळें उगें लावूं नको ॥५७॥ भुलाई म्हणे नवर्‍यासी । हिला नका ठेवूं ऐसी । लावून द्यावे मोहतरासी । पाहा पोरगा माळ्याचा ॥५८॥ ही पुंडलिकाच्या घरीं जाते । सदा त्यासी हितगुज करिते । एकमेकां पाहून भरतें । येत दोघां प्रेमाचें ॥५९॥ जाऊं चला शेगांवास । घेऊन या कारटीस । सांगूं अवघे महाराजास । चाळे या बायजीचे ॥६०॥ संतासी अवघें कळतें । ते सन्न्तीचे चाहाते । पोटामाजीं कधीं न निघते । चंदनाच्या दुर्गंधी ॥६१॥ भुला-शिवराम-बायजाबाई । पुंडलीक भोकर्‍या आला तोही । चौघे येऊन लागले पाई । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥६२॥ पुंडलिकासी पाहून । बोलूं लागले दयाघन । कीं बायजा तुझी बहीण । पूर्व जन्मींची पुंडलिका ॥६३॥ लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावें इजप्रती । दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥६४॥ भुले आपुल्या पोरीस । लावूं नको भलता दोष । हीं बहीण-भाऊ आहेत । मुळींच पूर्वजन्मींचें ॥६५॥ शिवाय या बायजीला । कोठेंहि न नवरा भला । ही न आली करायाला । संसार मुळीं जगामध्यें ॥६६॥ ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मवरी । जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतीं राहिली गे ॥६७॥ तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला । माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥६८॥ ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून । गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥६९॥ घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला । पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥७०॥ महाराज आपुल्या भक्ताप्रत । सदैव रक्षण करितात । ते कसे, ही थोडक्यांत । गोष्ट सांगतों ये ठाई ॥७१॥ भाऊ राजाराम कवर । एक   डाँक्टर । पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥७२॥ त्यास दुर्धर फोड झाला । आणविला मोठ्या डाँक्टराला । औषधपाणी करायाला । खामगांवामाझारीं ॥७३॥ बुलढाणा अकोला उमरावती । येथून डाँक्टर आणिले असती । शस्त्रक्रिया करण्याप्रती । त्या भाऊच्या फोडाला ॥७४॥ नाना औषधें पोटांत दिलीं । विविध पोटीसें बांधिलीं । शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥७५॥ कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढुं लागला । वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥७६॥ भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी । शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥७७॥ आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय । याविणें दुसरी सोय । कांहीं नसे राहिली ॥७८॥ पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ । या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नका ॥७९॥ ऐशी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं । रात्र गेली उलटोनी । सुमारें समय एकाचा ॥८०॥ तमानें भरलें अंबर । रात्रीचा तो शब्द किर्र । कोल्हे-हुकेनें कांतार । दणाणून गेलें हो ॥८१॥ तो एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली । गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्‍या बैलांची ॥८२॥ कंठामाजीं घागरमाळा । वाजूं लागल्या खळखळा । मागें पुढें सोडिला । होतां पडदा दमणीस ॥८३॥ दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी । डाँक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥८४॥ तों एक उतरला । ब्राह्मण दमणीला खालीं भला । दार ठोठावूं लागला । डाँक्टराच्या बंगल्याचें ॥८५॥ डाँक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं । प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥८६॥ ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान । तीर्थअंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥८७॥ डाँक्टर भाऊ कवराला । जो का आहे फोड झाला । हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥८८॥ प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत । मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥८९॥ तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण । त्या शोधाया कारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥९०॥ परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला । भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥९१॥ फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा । येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥९२॥ एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार । पाहा किती आहे जोर । समर्थाच्या अंगार्‍याचा ? ॥९३॥ भाऊस निद्रा लागली । व्याधीं पुढें बरी झाली । हळूहळू शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥९४॥ दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास । माझ्या गाडीबैलास । नुसता न चारा दिलास तूं ५॥ हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून । हृदय आलें उचंबळून । त्या भाऊ कवराचें ॥९६॥ त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन । लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥९७॥ कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण । अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥९८॥ असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं । त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥९९॥ होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार । स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥१००॥ जगू आबा पाटील हरी । बापुना व मंडाळी दुसरी । सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥१॥ त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार । येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्त झालासे ॥२॥ झरे जिवंत पाण्याचे । आसपास त्या माळाचे । आहेत म्हणून गांवाचें । नांव पडलें नागझरी ॥३॥ हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादाजी पाटलाचा । प्रथम आशीर्वाद झाला साचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥४॥ म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे । रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५॥ या परिपाठे म्हणून । नागझरीसी येऊन । अग्निरथांत बैसून । निघते झाले पंढरीला ॥६॥ हरीपाटला बरोबरी । समर्थाची होती स्वारी । बापुना आणि दुसरीं । माणसें पांचपन्नास ॥७॥ आषाढ शुध्द नवमीचा । तो दिवस होता साचा । समुदाय वारकर्‍यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥८॥ 

मेघ दाटले अंबरीं । क्वचित् कोठें भूमीवरी । पर्जन्याची वृष्टी खरी । होऊं लागली श्रोते हो ! ॥९॥ तें भुवैकुंठ पंढरपुर । गजबजून गेलें फार । भरतीं येतां सागर । जेवीं जाय उचंबळोनी ॥११०॥ प्रदक्षणेच्या रस्त्यावरी । टाळांची ती गर्दी खरी । ‘ जय जय रामकृष्ण हरी ‘ । भक्त म्हणती उच्च स्वरें ॥११॥ शब्द कवणाचा कवणाला । न ये ऐकावयाला । ऐसा आनंदी आनंद चालला । तो वानूं कोठवर ॥१२॥ नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार । श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥१३॥ या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा । भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥१४॥ त्यायोगें आकाशांत । बुक्क्याचें जणूं झालें छत । सुवास उठला घमघमीत । गर्दी तुळशीफुलांची ॥१५॥ श्रोते त्या समयाला । सम आले पंढरीला । उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥१६॥ हा प्रदक्षणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं । दर्शनाला भीड खरी । झाली असे राउळांत ॥१७॥ लिस हाताहातावरी । उभे राहिले रस्त्यांतरीं । पथें चालले वारकरी । भजन करीत हरीचें ॥१८॥ एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर । बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥१९॥ बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला । म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥१२०॥ स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी । दर्शनासी गेली सारी । आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥२१॥ मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत । राउळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥२२॥ मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना । केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥२३॥ बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी । कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥२४॥ तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून । तेवीं येई राउळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥२५॥ ‘ अरण ‘ होते आठ कोस । तैसें नव्हें येथें खास । मी मंदिराच्या सान्निध्यास । उभा आहे वाटेवरी ॥२६॥ तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ । मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥२७॥ ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला । परत बिर्‍हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥२८॥ मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसांचें उपोषण । बापुनाचें अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥२९॥ शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी । फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥१३०॥ बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघेजण । हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥३१॥ शेगांवाहून दर्शना । पंढरीसी आला जाणा । येथें येऊन खेळ नाना । फिरला पाहात गांवामध्यें ॥३२॥ याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? । ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥३३॥ कोणी म्हणाले बापुनाला । वेदान्त आहे अवघा आला । तो कशाशीं दर्शनाला । जाईल सांगा राउळांत ॥३४॥ त्याचा भगवंत हृदयांत । आहे सर्वदा खेळत । वेदान्त्याचें ऐसें मत । दगडामाजीं काय आहे ? ॥३५॥ आपण वेडे म्हणून । घ्याया गेलों दर्शन । बापुनाचा नारायण । वाटेल तेथें उभा असे ॥३६॥ मग दुसरा म्हणाला । मग हा येथें कशास आला ? । कां शेगांवीं तयाला । भेटला नसता ईश्वर ? ॥३७॥ अहो हे वेदान्ती । लोकां ज्ञान सांगती । शब्द चावटी हमेश करिती । अनुभवाचा लेश नसे ॥३८॥ सगुणोपासना झाल्या पूर्ण । मग होणार आहे ज्ञान । न आल्यासी लहानपण । तरुणपणा येतो कसा ? ॥३९॥ ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा । अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कुठूनी ? ॥१४०॥ तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत । ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥४१॥ गरीबाचें सांकडें । साधूलाच एक पडे । सत्संगती ज्याला घडे । तेच खरे भाग्यवान ॥४२॥ समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना । ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥४३॥ तों महाराज उभे राहिलें । कटीं हात ठेविलें । पाय खालीं जुळविलें । समचरण दावावया ॥४४॥ तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी । बापुनाच्या पडली दृष्टी । शीर ठेविलें पायांवर ॥४५॥

पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी । तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥४६॥ धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला । तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राउळांत ॥४७॥ इतर म्हणाले महाराजांस । तसेंच दर्शन आम्हांस । होऊं द्या आम्हां आहे आस । पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥४८॥ ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन । बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥ तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं । ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥ म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण । निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥

पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला । कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥५२॥ संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात । गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥५३॥ काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी । बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥५४॥ याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण । रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥५५॥ पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें । म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥५६॥ कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा । तो वर्‍हाडप्रांतीचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥५७॥ तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी । त्या पंढरपुरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥५८॥ प्रेतामागें चाले प्रेत । पोलिस शिरती घरांत । यात्रा काढून देण्याप्रत । डाँक्टराच्या हुकुमानें ॥५९॥ वारकर्‍याला ओढिती । गाडीमाजीं बसविती । चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥१६०॥ हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी । ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥६१॥ गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी । कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥६२॥ पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत । शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥६३॥ वाडा घटकेंत मोकळा झाला । हा वारकरी मात्र होता पडला । कठीण काळच्या समयाला । कोणी न येती उपयोगी ! ॥६४॥ लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती । तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥६५॥ तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर । म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥६६॥ लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया । याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥६७॥ पन्नास माणूस बरोबर । आपल्या येधवां साचार । मरीचा तो झाला जोर । सांप्रत या पंढरीसी ॥६८॥ अशा स्थितींत ये ठाई । थांबणें हें कांहीं बरें नाहीं । चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥६९॥ तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? । आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥१७०॥ ऐसें वाटून जवल गेले । वारकर्‍याला करा धरलें । त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥७१॥ चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्‍हाडप्रांता । वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्‍हाड कशाचें हो ? ॥७२॥ समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त । तई म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥७३॥ तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर । त्या वारकर्‍याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥७४॥ वाटूं लागली थोडी शक्ति । उभा राहिला त्वरित गती । संतानें ज्या धरिलें हातीं । त्यातें निजमनें यम नेई कसा ? ॥७५॥ घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळीच्या बरोबरी । चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थासमवेत ॥७६॥ आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी । म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥७७॥ ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार । आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥७८॥ पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी । मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामीच्या ॥७९॥ एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन । त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१८०॥ तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती । म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥८१॥ सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती । खट्टू झाला परम चित्तीं । समर्थासी पाहातां ॥८२॥ व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत । हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥८३॥ सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें । अशा पिशाला म्हणूं लागले । साधू लोक हाय हाय ॥८४॥ तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत । पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥८५॥ त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न । आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥८६॥ याला न कोणी उचलीती । गांजा सदैव धुनकिती । या वेड्यातें वंदिताती । ” महाराज, महाराज, ” म्हणून ॥८७॥ जळो याचें साधुपण । मला बुध्दि कोठून । झाली याचें दर्शन । घ्याया कांहीं कळेना ॥८८॥ त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनियां । येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥८९॥ आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित । कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥१९०॥ तें ऐकून रागावला । निज समर्था बोलूं लागला । अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥९१॥ कुत्रें मरून झाला प्रहर । त्याचें प्रेत रस्त्यावर । पडलें याचा विचार । तुम्हीं न कोणी केला कीं ॥९२॥ ऐसें बोलतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला । आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥९३॥ परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर । घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥९४॥ ऐसें बोलून कुत्र्यापासीं । येते झाले पुण्यराशी । स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥९५॥ तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर । म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥९६॥ मी व्यर्थ निंदा केली । योग्यता ना जाणली । ऐसें म्हणून घातली । समर्थाच्या मिठी पायां ॥९७॥ माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा । वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥९८॥ तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमीवर । करण्या जगाचा उध्दार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥९९॥ श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली । कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥२००॥ प्रसाद घेऊन गेला परत । आपुल्या तो देशाप्रत । समर्थ साक्षात् भगवंत । ऐसी प्रचीति आली तय ॥१॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । भाविकां लाभो सत्पथ । हेंचि इच्छी दासगणू ॥२०२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Kalpana Bhalerav

    गण गण गणात बोते…🙏🙏🙏